Digital Gold : वर्षभरात सोन्याने परताव्याच्या बाबतीत शेअर बाजारालाही मागे टाकलं आहे. परिणामी डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढला होता. यूपीआयमुळे सुलभ पेमेंट, लहान रकमेत सोने खरेदीची सोय आणि त्वरित उपलब्धता यामुळे ही पद्धत लोकप्रिय झाली होती. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये परिस्थिती अचानक बदलली. सेबीच्या कठोर इशाऱ्यानंतर डिजिटल गोल्डची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या नव्या प्रकारच्या गुंतवणुकीबद्दल गुंतवणूकदारांमध्ये आता मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
एका महिन्यात ४७% ची विक्रमी घसरण
नोव्हेंबर २०२५ मध्ये डिजिटल गोल्डच्या मागणीत विक्रमी घट नोंदवली गेली. यूपीआयद्वारे होणारी डिजिटल गोल्डची खरेदी तब्बल ४७% ने घसरून १२१५.३६ कोटी रुपये झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ही खरेदी २२९०.३६ कोटींपेक्षा अधिक होती. ही या वर्षातील सर्वात मोठी मासिक घसरण मानली जात आहे, जो बाजारपेठेसाठी मोठा धक्का आहे.
सेबीचा इशारा ठरला कळीचा
डिजिटल गोल्डच्या मागणीतील या घसरणीमागे सेबीचा इशारा हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. सेबीने स्पष्ट केले आहे की, डिजिटल गोल्ड त्याच्या नियमांखाली येत नाही. त्यामुळे गोल्ड ईटीएफ किंवा सॉवरेन गोल्ड बॉन्ड सारख्या सरकारी नियंत्रित गुंतवणुकीत मिळणारे संरक्षण किंवा विश्वास यात मिळत नाही.सर्वात मोठी समस्या ही आहे की, सेबी फिनटेक कंपन्यांच्या गोल्ड वॉल्ट्सची तपासणी करू शकत नाही. म्हणजेच, गुंतवणूकदारांच्या नावावर ठेवलेल्या सोन्याची वास्तविक उपलब्धता आणि गुणवत्ता याची कोणतीही ठोस हमी मिळत नाही.
मोठ्या गुंतवणूकदारांवर जास्त परिणाम
सेबीच्या इशाऱ्याचा परिणाम मोठ्या गुंतवणूकदारांवर सर्वात जास्त झाला आहे. जिथे पूर्वी लाखो रुपयांची डिजिटल गोल्ड खरेदी केली जात होती, आता गुंतवणूकदार लहान रकमेचीच खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे, मूल्यामध्ये मोठी घट झाली असली तरी, नोव्हेंबरमध्ये डिजिटल गोल्डच्या खरेदीचे एकूण युनिट्स ६.४४% ने वाढून १२.३४ कोटी युनिट्सवर पोहोचले. याचा अर्थ असा की, लोकांनी या गुंतवणुकीवरील विश्वास पूर्णपणे सोडलेला नाही, पण मोठी रक्कम लावण्यापासून मात्र ते सध्या दूर राहात आहेत.
वाचा - भारतात का वाढतेय इन्फ्लुएंसर बनण्याची क्रेझ? यातील पैसा आणि आकडेवारी पाहून विश्वास नाही बसणार!
तज्ज्ञांचा सल्ला
बाजार तज्ज्ञांच्या मते, डिजिटल गोल्ड त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांना लहान रकमेत नियमित गुंतवणूक करायची आहे. मात्र, जर एखाद्याला सुरक्षित, पारदर्शक आणि दीर्घकाळ टिकणारी सोन्यातील गुंतवणूक हवी असेल, तर गोल्ड ईटीएफ, एक्सचेंज ट्रेडेड गोल्ड रिसीट्स आणि सॉवरेन गोल्ड बॉन्ड हे अधिक चांगले आणि सुरक्षित पर्याय आहेत, कारण ते पूर्णपणे नियंत्रित आहेत.
